जागतिक साहित्य कला व्यक्तीविकास ह्या जगातील सर्वोत्कृष्ट

माझे शिक्षक

जागतिक साहित्य कला व्यक्तीविकास ह्या जगातील सर्वोत्कृष्ट कवी,लेखक,गीतकार, संगीतकार ,वाघ्या मुरळी, चित्रकार, शाहीर,शिल्पकार यांच्या समूहाचा मी अध्यक्ष म्हणून जगात सुपरिचित कसा झालो असे जेंव्हा लोक विचारतात तेंव्हा मला माझ्या बालपणातील मला शिकवीत असलेले ढोबळे गुरुजी आजही हृदयापासून आठवतात,जसेच्या तसे डोळ्यासमोर उभे राहतात. त्यांचे पूर्ण नाव श्री. विठ्ठल अण्णा ढोबळे. आमचे वर्ग शिक्षक,त्यांच्या अगोदर किंवा त्यांच्या नंतर माझ्या जीवनात कितीतरी गुरुवर्य आले ,पण तेच ढोबळे गुरुजी माझ्या स्मरणात का राहिले ? खरं तर ते " मारके "गुरुजी म्हणूनच प्रसिध्द होते. मीही त्यांचा खुप मार खाल्लेला आहे. खुपदा खाल्लेला आहे. पण त्यांच्यात अशी काय जादू होती की,माझ्या जीवन जडण घडणीत  तेच आहेत ,असे मी पक्के व विश्वास पूर्वक सांगू शकतो. ते मला फक्त चौथी ते सातवी पर्यंत शिकवत होते. ( त्यावेळी प्राथमिक शाळा पहिली ते सातवी अशी असायची ) पण ही चार वर्षे, या चार वर्षातील माझ्या मनातील उलथापालथ, विचारांची संक्रमणे, जीवनमूल्ये अशी काही रुजली की ती मला आजतागायत उपयोगी पडत आहेत. भलेही ते खूप शिकलेले नसतील पण जीवन म्हणजे काय व जीवनमुल्ये म्हणजे काय हे त्यांना पक्के माहीत होते. त्यानुसारच ते प्रत्येक विद्यार्थ्यांना घडवीत होते. निरपेक्ष बुद्धीने मेहनत घेत होते. प्रत्येक विद्यार्थ्याकडे वैयक्तिक लक्ष देत होते.

नवनवीन शैक्षणिक योजना, संकल्पना विद्यार्थ्यांच्या ज्ञान वृद्धीसाठी अमलात आणीत होते. कडक शिस्तीचे पण दूजाभाव त्यांच्या मनात कधीच नव्हता. पोटच्या मुलाप्रमाणे ते प्रत्येक मुलाला शिकवीत होते. अगदी सोप्या भाषेत, आम्हाला कळेल असं बोलायचे. आमच्या प्रत्येक शंका कुशंकाचे समाधान करायचे. आमच्या बाल सुलभ प्रश्नांची आम्हाला कळेल अशी उत्तरे द्यायचे. आमचा कोणताही प्रश्न अनुत्तरित सोडत नसत. हसत खेळत शिकवायचे,आम्हाला बोलकं करायचे.

त्यांनी वर्गातील मुलांचे चार गट केले होते. शाळेच्या आवारात प्रत्येक गटाने झाडे लावली पाहिजेत असा त्यांचा आग्रह असे. झाडांच्या निगराणी साठी ते स्पर्धा ठेवत.  साधारणपणे १९६७ ते ७० चा तो काळ ,त्या काळात देखील अधून मधून ते सामान्य ज्ञानाचे धडे द्यायचे. त्याच्या स्पर्धा घ्यायचे, त्यामुळे ते आम्हाला फार आवडायचे. आमच्या मनात जाणून घ्यायची जिज्ञासा त्यांनी रुजवली ,मग ती आयुष्यभर फोफावत गेली व अजूनही मला जग जाणून घेण्याची उत्सुकता त्याच्यामुळेच निर्माण झालेली आहे. चौकस बुध्दीने मी आजही जगाला समजून घेत असतो. माझ्या रुधीरात संस्कराचे रोपटे आमच्या ढोबळे गुरुजींनी 53 वर्षांपूर्वी लावले होते. त्यांनी अशी कित्येक जीवनमूल्ये आम्हाला दिली, रुजवली की जी आता आम्हास फळे देत आहेत. हे खरे शिक्षण की जे जीवन संपन्न करण्यास मदत करते. ते नेहमी म्हणत की संस्कार म्हणजेच जीवन,म्हणून सर्वांनी अंगी चांगल्या सवयी बाळगाव्या असे मी त्यांचे विचार आजही सर्वांना सांगत असतो. अभ्यासक्रमातील विषय तर ते शिकवत असतंच पण त्या बाहेरील सामान्यज्ञान व मुख्य म्हणजे चांगले संस्कारी, आदर्श जीवन कसे जगावे हे ते फार तळमळीने समजून सांगत. त्यासाठी विविध गोष्टी सांगत. दाखले, उदाहरणे देवून थोरा मोठ्यांची चरित्रे आम्हा पुढे मांडत व आमच्या पचनी पडेपर्यंत ते समजावत.त्यांच्या शिस्तीचा दरारा फारच होता.

पण तेवढाच त्यांच्या बद्दल आम्हास आदरही होता. आमच्या वर्गाचा निकाल १०० % असायचा. ढोबळे  गुरुजींचा वर्ग म्हणजे आदर्श वर्ग, अशी त्यावेळी वर्गाची ख्याती होती. म्हणून मी एका जगावेगळ्या समूहाचा अध्यक्ष होऊ शकलो व तेच आदर्श जीवनात समूह सदस्यांनी अंगी बाळगून अजून मोठे व्हावे अशी माझी नेहमी तळमळ असते .त्यांना जगात प्रसिद्धी मिळावी म्हणून जगातील सर्वोत्तम जनसंपर्क अधिकारी श्री.विलास कुलकर्णी यांची मी नियुक्ती केली आहे . आमचे ढोबळे गुरुजी आता नाहीत. पण त्यांच्या आठवणीने मला हुंदका आवरता येत नाही. त्यांच्या स्मृतीला वंदन करून मी पुढे लिहू शकत नाही इतका भाव विव्हळ झालो आहे.
पांडुरंग कुलकर्णी डल्लास, अमेरिका 

रिपोटर चंद्रकांत सी पूजारी

Leave a Replycomments

Loading.....
  • No Previous Comments found.