महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक 2026 : दुसऱ्या टप्प्यातील मतदानासाठी अधिकारी-कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न
सोलापूर : महाराष्ट्र विधान परिषद द्विवार्षिक निवडणूक 2026 च्या मतदानाच्या दुसऱ्या टप्प्यासाठी सोलापूर येथे सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण यशस्वीरित्या पार पडले. यावेळी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी सुशांत बनसोडे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते. या निवडणुकीसाठी 6 मतदान केंद्रे, 2 उमेदवार आणि 616 मतदार असून मतदान 18 जून 2026 रोजी सकाळी 8 ते दुपारी 4 वाजेपर्यंत होणार आहे. तर मतमोजणी 22 जून 2026 रोजी करण्यात येणार आहे. प्रशिक्षणात मतदान प्रक्रिया, मतपत्रिकेचे नियम, मतदार ओळख, मतदान केंद्र व्यवस्थापन, मतदान साहित्याची तपासणी तसेच मतपेटी सील करण्याची प्रक्रिया याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. मतदारांनी मतपत्रिकेवर उमेदवारासमोर 1, 2, 3 अशा पसंतीक्रमाने मतदान करणे आवश्यक असून भारत निवडणूक आयोगाने दिलेला जांभळा स्केचपेन वापरणे बंधनकारक असल्याचे स्पष्ट करण्यात आले. मतदान केंद्रांवर मोबाईल व स्मार्टवॉचला बंदी, मतदानाची गोपनीयता राखणे आणि 100 मीटर परिसरात सुरक्षा व्यवस्था ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या. निवडणूक साहित्याचे वितरण 17 जून रोजी सकाळी 9 वाजता नियोजन भवन, सोलापूर येथे करण्यात येणार असून सर्व मतदान पथकांना वेळेत उपस्थित राहण्याचे निर्देश देण्यात आले. प्रशिक्षणाच्या शेवटी उपजिल्हाधिकारी संतोष कुमार देशमुख यांनी सर्व अधिकारी व कर्मचाऱ्यांचे आभार मानले.
रिपोर्टर : प्रभव चंद्रकांत काले
No Previous Comments found.