हुतात्मा एक्सप्रेसच्या सेवेला २५ वर्षे पूर्ण; मध्य रेल्वे सोलापूर विभागाकडून रौप्य महोत्सव साजरा

सोलापूर :  दि. १४ : सोलापूर–पुणे दरम्यान धावणाऱ्या प्रवाशांच्या अत्यंत लोकप्रिय हुतात्मा एक्सप्रेसने आपल्या सेवेला २५ वर्षे पूर्ण केली असून, १५ जुलै २०२६ रोजी या ऐतिहासिक रेल्वे सेवेचा रौप्य महोत्सव साजरा करण्यात येणार आहे. १५ जुलै २००१ रोजी सुरू झालेली ही रेल्वे आज लाखो प्रवासी, विद्यार्थी, व्यावसायिक, नोकरदार आणि पर्यटकांची विश्वासार्ह जीवनवाहिनी बनली आहे. १२१५८ (सोलापूर–पुणे) आणि १२१५७ (पुणे–सोलापूर) या क्रमांकाने धावणारी हुतात्मा एक्सप्रेस सुमारे २६३ किमी अंतर अवघ्या चार तासांत पूर्ण करते. कुर्डुवाडी आणि दौंडसह महत्त्वाच्या स्थानकांवर थांबा देत ही गाडी दोन्ही शहरांना प्रभावीपणे जोडते. या गाडीला स्वातंत्र्यलढ्यातील सोलापूरच्या चार हुतात्मे जगन्नाथ शिंदे, कुर्बान हुसेन, किसन सारडा आणि मल्लप्पा धनशेट्टी यांच्या स्मरणार्थ 'हुतात्मा एक्सप्रेस' हे नाव देण्यात आले असून, त्यांच्या बलिदानाला ही रेल्वे कायमस्वरूपी अभिवादन करत आहे. मध्य रेल्वेच्या सोलापूर विभागाने हुतात्मा एक्सप्रेसच्या २५ वर्षांच्या यशस्वी प्रवासाबद्दल समाधान व्यक्त करत प्रवाशांच्या सुरक्षा, सुविधा आणि सेवा गुणवत्तेत सातत्याने सुधारणा करण्याची ग्वाही दिली आहे. २६व्या वर्षात पदार्पण करणारी ही गाडी भविष्यातही सोलापूर–पुणे परिसराच्या सामाजिक, शैक्षणिक आणि आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावेल, असा विश्वास रेल्वे प्रशासनाने व्यक्त केला आहे.

रिपोर्टर : प्रभव चंद्रकांत काले 

Leave a Reply



comments

Loading.....
  • No Previous Comments found.