पाणीटंचाई टाळण्यासाठी दौंडमध्ये आतापासून उपाययोजना करा

पुणे : एल निनोच्या संभाव्य प्रभावामुळे आगामी काळात पाऊस कमी होऊन पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेता, दौंड नगरपरिषदेने आतापासून पाणीबचतीसाठी ठोस उपाययोजना कराव्यात, अशी मागणी ‘भारत अगेन्स्ट करप्शन’चे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रोहित पाटील यांनी केली आहे. यासंदर्भात त्यांनी नगरपरिषदेच्या मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिले आहे.
शहरातील पाणीगळती तातडीने थांबविणे, खराब नळ व पाइपलाइन बदलणे, सार्वजनिक नळांना तोट्या बसविणे आणि पाण्याचा अनावश्यक वापर रोखणे यासाठी नगरपरिषदेने कार्यवाही करावी. उपलब्ध पाण्याचा काटकसरीने वापर व्हावा, यासाठी पाणीपुरवठ्याचे योग्य नियोजन करण्याची मागणीही निवेदनातून करण्यात आली आहे.
पाणीबचतीच्या प्रयत्नांमध्ये नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी शहरात जनजागृती मोहीम राबवावी. नळ सुरू ठेवून पाणी वाहू देऊ नये, तोटी नसलेल्या नळांना तोट्या बसवाव्यात, गळती होणारे नळ तातडीने दुरुस्त करावेत आणि पाण्याचा अनावश्यक वापर टाळावा, असे आवाहन नगरपरिषदेने नागरिकांना करावे, असे पाटील यांनी सुचविले आहे.
‘पाणी वाचवा, पाणीटंचाई टाळा’ हा संदेश नागरिकांपर्यंत पोहोचवून पाणीबचतीची सवय रुजवावी. भविष्यातील संभाव्य टंचाईच्या पार्श्वभूमीवर नगरपरिषद आणि नागरिकांनी आतापासून प्रयत्न करावेत, अशी अपेक्षा निवेदनात व्यक्त करण्यात आली आहे.

रिपोर्टर : प्रमोद 

Leave a Reply



comments

Loading.....
  • No Previous Comments found.